पुणे -पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शहरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपने आत्तापर्यंत आरोप असलेल्या कोणालाही पक्षात घेतले नाही. आरोप असणारा कोणी जर पक्षात आला असेल तर, त्याच्यावरही कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपने आरोप असलेल्या कोणालाही पक्षात घेतले नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा
भाजपने आत्तापर्यंत आरोप असलेल्या कोणाला पक्षात घेतले नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
पालिकेतील कामाचा आढावा घेतल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना राज्यातील पूरस्थितीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकावरील पूरग्रस्तांच्या नाराजी बाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी केंद्रीय पथक शुक्रवारी पाहणीसाठी आले असले तरी पहिल्या दिवसापासून जिल्हा प्रशासनाने सर्व माहिती घेतली आहे. ही माहिती केंद्रीय पथकाला देणे हाच खरा प्रवास असतो. दुसरी बाब म्हणजे पूर परिसराचे क्षेत्र पाहता कुठे ना कुठे तरी या पथकाला पोहचायला रात्र होणारच, असे म्हणत पथकाची पाठराखण केली.
पूरग्रस्त शंभर गावातील मंदिरे, मुलींचे विवाह, गोबर गॅस प्रकल्प उभारणे, महिलांना कपडे धुण्यासाठी नदीलगत काठ बांधून देणे यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पण हे आवाहन करून सरकार आपले हात तर वर करत नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.