पुणे - तब्बल 240 दिवस लांबलेला ऊस गाळप हंगाम अखेर आज संपला. याबरोबरच राज्यातला अतिरिक्त ऊसाचा प्रश्नही संपला असल्याचा दावा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला. राज्यात यंदा 100 वर्षांतील विक्रमी 137.27 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. ऊस गाळप हंगाम २०२१ - २२ अनुषंगाने माहिती देण्यासाठी आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -महागाई आंदोलनातील पालेभाज्या कार्यकर्त्यांच्या स्टॉलवरील, त्या परत विकल्या जाणार - प्रदीप देशमुख
राज्यातील 200 पैकी 198 साखर कारखाने बंद झाले आहेत. तर 1 हजार 320 लाख टन उसाचे यशस्वी गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत 137.27 लाख टन साखर तयार झाली आहे. कोल्हापूर विभागातील सर्व म्हणजे 36, पुणे विभागातील 30 पैकी 29, सोलापूर विभागातील 47, नगर विभागातील 28, तर औरंगाबाद विभागातील 25 पैकी 24 साखर कारखाने बंद झालेले आहेत. नांदेडमधील सर्व म्हणजे 27, अमरावतीमधील 3 तर नागपूरमधील चारही कारखाने बंद झालेले आहेत.
पुढच्यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सँटलाईट इमेज मार्फत आणि स्वतंत्र ऑनलाईन अॅप मार्फत ऊसाची नोंद केली जाणार आहे. राज्यात दिवसेदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत जात असून यावर्षी 1320.31 लाख टन ऊस गाळप झाला आहे. तसेच, इथेनॉल निर्मिती करण्याकडे लक्ष दिल्याने देशातील साखरेला परदेशातही मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होत आहे. राज्यात ऊस गाळप चांगल्या पद्धतीने झाले असून 137.27 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यावर्षी 240 दिवस कारखाने सुरू होते, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.