पुणे -बांधकाम व्यवसायिकाला फायदा व्हावा यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, उपायुक्त शेषेराव सुर्यवंशी, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांनी खोट्या पुराव्याच्या आधारे माझ्यावर निलंबनाची कारवाई केली, असा गंभीर आरोप पुणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी केला आहे.
एका बांधकाम व्यवसायिकाकडून तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी धनंजय धुमाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जून 2016 चे हे प्रकरण आहे. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी धनंजय धुमाळ यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
'खोटी तक्रार देऊन माझ्यावर कारवाई केली'
पुढे बोलताना धनंजय धुमाळ म्हणाले की, बांधकाम व्यवसायिक संदीप जाधव आणि हेमंत गांधी हे काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावयचे. करोडो रुपयांच्या जमीन कवडीमोल भावाने खरेदी करत असत. या प्रकरणाची मी चौकशी करत होतो, दरम्यान हे प्रकरण तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना महागात पडू शकतं, याची जाणीव झाल्याने पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी संदीप जाधव यांना खोटी तक्रार देण्यास सांगून माझ्या विरुद्ध कारवाई केली, असा आरोप धनंजय धुमाळ यांनी केला आहे.