महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणाऱ्या राजनाथ सिंहांनी महाराष्ट्राची माफी मागावी - संभाजी ब्रिगेड - Sambhaji Brigade demand

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असे वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते.

Sambhaji Brigade
संभाजी ब्रिगेड

By

Published : Aug 28, 2021, 3:37 PM IST

Updated : Aug 29, 2021, 6:03 PM IST

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असे वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. राजनाथ सिंह यांनी खोटा, चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांमध्ये सांगून अज्ञानाचे दर्शन दिले. देशाचे संरक्षण मंत्री यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अज्ञान आहे. खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाची गद्दारी करू नये. राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राची व तमाम शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिग्रेड यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासांची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्येसुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टानेसुद्धा मान्य केले आहे. मात्र, जाणीवपूर्वक खोडसाळपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व नाकारण्यासाठी गुरु म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे सांगितले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. आरएसएसच्या तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही फार मोठी गॅंग आहे, असे संभाजी ब्रिग्रेड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका नाही - अजित पवार

  • राजनाथ सिंह यांनी तमाम शिवप्रेमींची माफी मागावी-

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले असे आजपर्यंत कोणीही लिहिले किंवा सांगितले नाही. हा खोटारडेपणा वेळेत थांबवा. राजनाथ सिंह यांनी हा खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे. खोटा इतिहास आम्ही कधीही मान्य करणार नाही. म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तमाम शिवप्रेमींची तत्काळ माफी मागावी, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ढाल, तलवार व इतर खेळाचे ज्ञान दिले. वीर बाजी पासलकर यांनीसुद्धा तलवारबाजी व इतर खेळाचे शिक्षण दिले. असे असताना खरा इतिहास सांगितला व लिहिला जात नाही. "इतिहास घडवला मावळ्यांनी परंतु तो लिहिला नाही, लिहिला मनुवादी कावळ्यांनी म्हणून तो सोयीचा लिहिला व सांगितला जातो" हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितलं.

  • हा इतिहासातील खोडसाळपणातून केलेला भ्रष्टाचार -

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. मात्र, त्यांना 'शूद्र' ठरवून 'छत्रपती' होण्यास विरोध करणारे अर्थात शिवराज्याभिषेक सोहळ्यास विरोध करणारे आज गुरु म्हणून सांगितले जातात. हा इतिहासातील खोडसाळपणातून केलेला भ्रष्टाचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास व दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले नाही. तसा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे खोटं बोलतात. चुकीची माहिती घेऊन त्यांनी चुकीचा इतिहास मांडला. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावं हीच संभाजी ब्रिगेडची मागणी असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा -उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालवली तीन चाकी ई-रिक्षा, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ

Last Updated : Aug 29, 2021, 6:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details