पुणे -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी एमआयएम आणि औरंगाबादच्या नामांतरावरूनही महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. सोबतच त्यांनी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि औरंगाबदचे नामांतर संभाजीनगर करावे, अशी मागणीही पंतप्रधान मोदींकडे केली.
अयोध्या दौऱ्यावर स्पष्टीकरण -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण सांगितले. पायाचं दुखण सुरू आहे, त्यामुळे कमरेला त्रास होतो. त्याची 1 तारखेला शस्त्रक्रिया आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच त्यांना अयोध्येत प्रवेश देऊ असे जाहीर केले होते. भाजपच्या खासदाराने त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना दिलेले हे आव्हान म्हणजे मनसेविरोधात रचलेला सापळा होता, असा आरोप राज ठाकरे यांनी आज (22 मे) केला आहे. ते म्हणाले, 'माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे हे सापळा होता. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झाले असते, तर माझ्या कार्यकर्यांवर गुन्हे दाखल झाले असते, कारण माझे कार्यकर्ते शांत बसणारे नव्हते. त्यांना तुरुंगात अडकवले असते. आणि ऐन निवडणुकीच्या काळात हे उकरुन काढले गेले असते. म्हणजे, निवडणुकीदरम्यान मनसेचे कार्यकर्तेच गायब झाले असते.'माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले, 'मी मुद्दामहून दोन दिवास आधी या दौऱ्याबद्दल सांगितले. कोण काय बोलतं. हे बघायचं होतं. माझ्या दौऱ्याला विरोध हा मुद्दामून सुरू केला गेला. हा एक सापळा आहे. हे माझ्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच तिथे कारसेवा करताना कारसेवकांवर हल्ला झाला होता. त्यात अनेक कारसेवक मारले गेले होते. त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकण्यात आले होते. त्यांचेही दर्शन मला घ्यायचे होते.' एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो, हे शक्य आहे आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल, पण कार्यकर्ते अडकू देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांना माफी मागावी हे आताच कसे आठवले, असा सवालही त्यांनी केला. या प्रकारातून चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचही ते म्हणाले. तसचे यावेळी त्यांनी गुजरातमधील अल्पेश ठाकूर यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, गुजरातमध्ये एक बलात्कार झाला होता. त्यानंतर अल्पेश ठाकूर यांनी गुजरातमध्ये 10 ते 15 हजार उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांना गुजरातमधून हाकलून लावले होते. तिथून कोण माफी मागेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा प्रकार आताच कसा सुरू झाला हे समजून घ्यायला पाहिजे, मनसे विरोधात सगळे एकत्र होतात. कारण आमचे हिंदुत्व त्यांना झोंबले आहे, असेही ते म्हणाले.