पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग निघत नाही, तोवर कोणत्याही निवडणुका नको, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला केला.
निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. पण जर सरकारच्या फायद्याच असेल की निवडणुका नकोच असतील, तर ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. ओबीसींची जनगणना झाल्यावर निवडणुका घेण्यात याव्या, यावर मनसेची काहीही हरकत नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे.
कोरोनाची भीती दाखवून सरकार सगळ्या गोष्टी करत आहे. सरकारमधील पक्षाचे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात होत आहे. तिकडे गर्दी चालते पण यांना दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी चालत नाही. जर नियम असेल ते नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत. गणेशोत्सवात मंडळे असतात आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे ते म्हणाले.