पुणे- लोकसभेच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला असताना राज्यात निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 5 एप्रिलला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या दौऱ्यात ते सभा अथवा रॅलीत सहभागी होणार नाहीत. तर विद्यार्थ्यांशी राहुल गांधी थेट असा दीड तास संवाद साधणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी 5 एप्रिलला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ते पुण्यातल्या महाविद्यालयीन तरुणाशी, विविध संघटनांच्या तरुणांशी संवाद साधणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले. पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानीचे शहर आहे. अनेक विद्यार्थी भवितव्य घडविण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केल्याचे कदम यांनी सांगितले.
असा असेल कार्यक्रम-
हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी 5 हजार विद्यार्थ्यांशी राहुल गांधींचा दीड तास संवाद चालणार आहे. त्यांच्यासोबत सॅम पित्रोदा असणार आहेत. युवा पिढीशी थेट संवाद साधावा यासाठी राहुल गांधी यांचे प्रयत्न असल्याची कदम यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत विश्वजीत कदम काँग्रेस पक्षाच्या कामकाजात देशाच्या जडघडणीत तरुणांचाही हातभार लागावा अशी राहुल गांधींची भावना आहे. त्यासाठी हा कार्यक्रम असून हा बिगर राजकीय आहे. तसेच प्रचाराचा हेतू नसल्याचे कार्यक्रमाचे आयोजक एनएसयुआय आणि युवा सुराज्य प्रतिष्ठान यांच्याकडून सांगण्यात आले.
स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत राहुल गांधी यांची भेट ठरवण्याचे पुणे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. तर आगामी काळात प्रियंका गांधी यांची पुण्यात रॅली आयोजित करण्यासाठी सुद्धा काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.