पुणे -शनिवार वाडा ही पुणे शहराचा इतिहास सांगणारी वास्तू मानली जाते. याच शनिवार वाड्या भोवती पुणे शहराशी संबंधित अनेक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आढळून येतो. शहराची मुख्य ओळख असलेल्या या शनिवार वाड्याची निर्मिती 1736 साली पहिले बाजीराव पेशवा यांनी केली होती. त्यांनी सुरुवातीला 13 खोल्यांचा हा शनिवार वाडा बांधला होता. नंतर वेळवेळी या वाड्याच्या बांधकामात अधिक वाढ होत गेली.
मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले पेशवे पुढे याच शनिवार वाडयातून कारभार चालवत होते. पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक ठरलेला हा शनिवार वाडा बांधताना सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देण्यात आले होते. तशीच बांधकाम रचना या वाड्यात दिसून येते. या वाड्याचा मुख्य दरवाजा हा उत्तरेला आहे, याला दिल्ली दरवाजा असे म्हणतात. तर गणेशदरवाजा, जंभळंदरवाजा, मस्तानी दरवाजा आणि खिडकी दरवाजा असे इतर चार प्रवेश दरवाजे शनिवाड्याला आहेत. पहिल्या बाजीरावानंतर आलेल्या पेशव्यांनी वेळोवेळी या वाड्यात बांधकाम करत वाड्याच्या सौंदर्यात अधिक भर घातली. काही काळ हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे याच वाड्यातून हलवण्यात आली होती.