पुणे - संकटात सापडलेल्या पिडीत महिलांना पोलिसांची मदत, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञाचे मार्गदर्शन, विधीतज्ञाचा सल्ला, सरंक्षण अधिकारी व पुर्नवसन या सर्व प्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरीता बहुउद्देशीय भरोसा सेल 2019 मध्ये (Pune Bharosa Cell ) स्थापन करण्यात आला होता. भरोसा सेलबाबत पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी माहिती दिली आहे.
महिला, लहान बालकांच्या आणि जेष्ठ नागरिक यांच्या संदर्भात अनेक तक्रारी येत असतात. त्यांच्या समस्यांचे पूर्वी देखील निराकरण केले जात असे. मात्र, त्यांच्यावरती काहीतरी आखीव-रेखीवपणा येण्यासाठी अभ्यास करून भरोसा सेल हा विभाग गुन्हे शाखेचे नियंत्रणात आणला गेला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पोलीस, मानसोपचारतज्ञ, विधी तज्ञ, वकील, महिला बालकल्याण खाते अधिकारी, समुपदेशक, घरगुती हिंसाचार कायदा अभ्यासक, ऑफिसर या सर्वांना एकाच छताखाली आणत ही योजना राबवण्यात आली.
गेल्या तीन वर्षापासून भरोसा सेलवरील लोकांचा भरोसा वाढत चालला आहे. येथे महिलांना पुनर्वसनापासून ते वैद्यकीय सेवा देखील दिल्या जातात. जेणेकरून आपल्याला योग्य न्याय आणि योग्य माहिती मिळू शकेल, असा त्यांना विश्वास मिळतो.
किती तक्रारींचे निवारण झाले?
2019 साली 3099 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील 2036 केसेसमध्ये तडजोड केली गेली आणि उर्वरित प्रकरणामध्ये पुढे कायदेशीर कारवाई झाली. 2020 साली 2075 तक्रारी पैकी 70 टक्के प्रकरणात तडजोड केला गेला. तसेच 2021 साली 2871 केसेस फाईल झाल्या. त्यातील 1450 केसेसमध्ये तडजोड झाली. 228 केसेसमध्ये गुन्हे दाखल झालेत आणि 180 केसेसवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
तक्रार निवारणनंतर देखील पाठपुरावा -
भरोसा सेल येथे सर्व विभाग एकत्र असल्यामुळे पीडितेला सर्व सेवा आणि मदत एकाच छताखाली मिळते आणि एखादा तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर देखील तक्रारदाराचा पाठपुरावा केला जातो. जेणेकरून त्याला भविष्यामध्ये कोणत्या समस्या निर्माण होणार नाही. यामध्ये तक्रारदार महिलेला फोन करून अथवा त्यांच्या घरी जाऊन तक्रारीचे निवारण झाले आहे की नाही याचा आढावा घेतला जातो.
सक्षम भविष्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक -
शक्ती कायदा आणि इतर कायद्याद्वारे भविष्यामध्ये कायद्याच्या कक्षा रुंदावत आहे. यामध्ये सध्या My safe pune नावाचे एक अप्लिकेशन आहे. याद्वारे कर्मचारी पोलिस कर्मचारी सध्याला कुठे आहेत याची माहिती मिळते. यामुळे कामात पारदर्शीपणा येतो. भविष्यात असे अँप्लिकेश आम्ही पीडितांना देऊ त्यामुळे त्यांची ख्यालीखुशाली आम्हाला समजेल. तसेच तरुणाईसाठी शक्ती कायदा सोबतही इतर कायद्याची माहिती देण्यासाठी लीगल लिटरसी कॅम्पेन सुरू करण्याचा मानस आहे. हे कँपेनिग युट्युब अथवा ॲप द्वारे सुरु करणार आहोत. आपल्या प्रशासकीय सेवेची जुजबी माहिती या कॅम्पेनिगद्वारे सर्वसामान्यपर्यंत पोहोचेल.
शक्ती कायद्यामुळे बसेल गुन्हेगारीवर चाप -
शक्ती कायद्यामुळे आम्हाला देखील वेळेची मर्यादा येते आहे. मात्र त्यामुळे फास्टट्रॅकद्वारे न्याय देणे सोपे होईल. कायद्याला अभिप्रेत अशी सकारात्मक आम्ही बाळगून आहोत, असे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
दामिनी पथक -
भरोसा सेलमध्ये आणखीन काही भाग आहे त्यामुळे दामिनी मार्शल पथक हे महिला कक्षामध्ये येते. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिला बीट मार्शल द्वारे महिलांची छेडछाड करणाऱ्याला प्रतिबंध बसावा यासाठी दामिनी मार्शल हे पथक तैनात केले आहेत. या पथकाद्वारे महिलांच्या छेडछाडीला आळा बसण्यास मदत झालेली आहे.
हेही वाचा -VIDEO : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शिर्डी साईदरबारी; म्हणाले, आत्मनिर्भर राज्य बनविण्यासाठी जनतेचा सहयोग हवाय...