पुणे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( Controversial Tweet Against Rashmi thackeray ) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्या प्रकरणी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया ( Jiten Gajariya Tweet ) यांच्या विरोधात आता पुण्यात युवतीसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. युवती सेनेने पुण्यात आज अनोखे आंदोलन ( Pune Yuvatisena Agitation Against Jiten Gajariya ) करत जितेन गजारिया यांना पोस्टाने जुन्या चपला पाठवल्या आहेत.
'या विकृतीला आळा घातला नाही, तर..' -
दरम्यान, जितेन गजारिया यांनी केलेल्या या ट्विटचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच पुण्यात युवती सेनेने आज आंदोलन करत जितेन गजारिया यांच्या चेंबूरच्या पत्त्यावर जुन्या चपला भेट म्हणून पाठवल्या आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना भाजपाला इशारा दिला आहे. 'भाजपाच्या लोकांनी आता समजून घ्या आता तर फक्त चप्पल पाठवत आहोत, पण वेळीच जर तुम्ही या विकृतीला आळा घातला नाही, तर त्याच पायताणाने या युवती तुम्हाला तुमची जागा दाखवायला ही कमी पडणार नाही, तसेच महाराष्ट्रात कुठल्याही महिलेचा अपमान सहन केला जाणार नाही' असे युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांनी सांगितले आहे.