महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार - अजित पवार

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आता पुर्णपणे नियंत्रणात आला आहे. शहरातील उद्याने दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. याबाबतचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना शुक्रवारी दिला आहे.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Oct 22, 2021, 7:23 PM IST

पुणे - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदशक सूचनांचे पालन करून आठवडे बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी -

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने 1 कोटी 17 लक्ष लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे -

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी.

'मिशन कवच कुंडल’ अंतर्गत 8 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 4 लाख 27हजार लसीकरण -

बैठकीत सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सीन लशीची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. मागील 3 आठवड्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रात आणि 15 ऑक्टोबर रोजी पुणे ग्रामीणमध्ये ० मृत्यूची नोंद झाली आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ठिकाणी विकेंड कोविड लसीकरणास सुरूवात करण्यात आली असून ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालीयन विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरण नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत 8 ते 20ऑक्टोबर दरम्यान 4 लाख 27 हजार लसीकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details