पुणे - टाळेबंदीचे नियम अजूनही लागू असल्याने चित्रपटगृह व्यवसायाला घरघर लागली आहे. एकपडदा चित्रपटगृह मालकांची संघटना असलेल्या ‘पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’ने चित्रपटगृह बंद करून अन्य व्यवसाय सुरू करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परवानगी मागितली आहे.
चित्रपटगृह मालकांना अन्य व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली तर, सरकारला वाढीव उत्पन्नाचे स्रोत मिळणार आहे. तसेच एकपडदा चित्रपटगृह मालकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा ‘पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’ने व्यक्त केली आहे.
कोरोना संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद आहेत. एकपडदा चित्रपटगृह चालविणे अवघड झाल्याची व्यथा संघटनेने मांडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील ३४पैकी १८ एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत. त्याचवेळी मल्टिप्लेक्सचे दीडशे पडदे झाले आहेत. बंद पडलेल्या एकपडदा चित्रपटगृहाच्या वास्तू पडीक असून त्याचा कोणालाच फायदा होत नाही.
पूना एक्झिबिटर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष दीपक कुदळे म्हणाले, की राज्य सरकारने २०००मध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहासंबंधी कायदा करून विविध सवलतींद्वारे प्रोत्साहन दिले. त्यावेळी एकपडदा चित्रपटगृहांच्या वाट्याला निराशा आली. हा व्यवसाय बंद करून दुसरा काही व्यवसाय करावा, असा विचार मनात आला. तरी, यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सरकारने मोकळा ठेवला नाही. सर्वच चित्रपटगृह मालक अर्धपोटी राहण्यापेक्षा, काही चित्रपटगृहे बंद झाल्यास उरलेल्यांचे पोट भरेल, अशी भावना आहे. तरी आमची मागणी मान्य करून एकपडदा चित्रपटगृहांसाठी व्यवसाय बदल करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी कुदळे यांनी मागणी केली.
'पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सदानंद मोहोळ, सहसचिव दिलीप निकम, माजी अध्यक्ष दीपक कुदळे आणि माजी खासदार व चित्रपट व्यावसायिक अशोक मोहोळ यांनी एकपडदा चित्रपटगृह चालकांची कैफियत मांडून त्यावर अन्य व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.