पुणे - राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारले. त्यासाठी १०० कोटी रुपये इतका खर्च केला असल्याचे सांगितले. मात्र, येथील अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य कोरोना रुग्णांसह पत्रकारांना देखील स्वत:चे प्राण गमवण्यापर्यंत बसला आहे. त्यामुळे शासनाने या अनागोंदी कारभाराचा खुलासा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसंग्राम पुणे शहरतर्फे देण्यात आला आहे.
जम्बो कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराचा खुलासा करा; शिवसंग्रामची मागणी - पुणे कोविड सेंटर न्यूज
शिवसंग्राम पुणे शहरतर्फे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पुणे मनपा आयुक्तांना याबाबतच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शिवसंग्राम पुणे शहरतर्फे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पुणे मनपा आयुक्तांना याबाबतच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, आदी उपस्थित होते. भरत लगड म्हणाले, जम्बो कोविड सेंटरमुळे पुणे व परिसरातील कोरोना रुग्णांची फार मोठी सोय होईल, अशी अपेक्षा होती. पण, आजपर्यंतचा अनुभव पाहता पुणेकरांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. कोटयवधी रुपये खर्च करून उभारलेले हे सेंटर प्रत्यक्ष शासकीय यंत्रणेद्वारे न चालवता एका बेजबाबदार खासगी संस्थेला चालवायला दिले, ही चूक देखील उघड झाली आहे. ही रक्कम पूर्वीपासून सुरू असलेल्या सेंटरला दिली असती, तर तेथील रुग्णसंख्या व वैद्यकीय सेवा वाढवता आली असती. त्यामुळे या अनागोंदी कारभाराचा शासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.