महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'२०१२ मध्येच चीनमधील खाणकामगारांना झाला होता कोविडसदृश आजार'

वुहानची प्रयोगशाळा वेगवेगळ्या विषाणूचे नमुने आणि जिवंत विषाणू साठवून ठेवते. या प्रयोगशाळेत त्याच्या जनुकीय माहितीमध्ये बदल करून त्याचे त्या विषाणूच्या वेगवेगळ्या प्राण्यांना संसर्ग करण्याच्या क्षमतेमध्ये झालेल्या बदलांवर संशोधन करण्यात येते. त्यामुळे नॉवेल कोरोना विषाणू हा त्या प्रयोगशाळेतील एक प्रयोग तर नाही ना, असाही संशय आहे. या माहिती लपवण्यामध्ये किंवा अर्धसत्य सांगण्यामागे काय कारण आहे, असा सवाल देखील या शास्त्रज्ञांनी केला आहे.

शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर
शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर

By

Published : Aug 20, 2020, 7:13 PM IST

Updated : Aug 21, 2020, 1:00 PM IST

पुणे -जागतिक महामारीला कारणीभूत असलेल्या नॉवेल कोरोना विषाणू अर्थात कोविड-१९ हा आजार कुठून आला, याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. सुरुवातीला नॉवेल कोरोना विषाणू हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेमधून किंवा वुहान येथील जिवंत प्राणी विकण्याच्या बाजारातून अपघाताने बाहेर पडला असावा, अशा संशय व्यक्त केला जात होता. पण नुकतेच चीनने तो तेथून आला नाहीये, असे सांगितले. तसेच, त्याची उत्पत्ती कोठे झाली असावी, याचीही माहिती चीनने दिली नाही.

जागतिक स्तरावरही हे शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पुण्यातील दोन संशोधकांना या संदर्भात काही धागे दोरे हाती लागले आहेत. डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर यांनी विविध संशोधन प्रबंध आणि जैवमाहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाचा सर्वात जवळचा नातेवाईक आरएटीजी ( RaTG ) १३ हा विषाणू कुठून आला असावा, हे शोधण्यात यश मिळवलेले आहे.

'२०१२ मध्येच चीनमधील खाणकामगारांना झाला होता कोविडसदृश आजार'

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आरएटीजी ( RaTG ) १३ हा विषाणू एका तांब्याच्या खाणीमधील वटवाघळांमध्ये २०१२ मध्ये आढळला होता. ही खाण चीनमधील युनान प्रांतातील मोजियांग येथे आहे. या खाणीत २०१२ च्या सुमारास ६ खाणकामगार ही खाण स्वच्छ करण्यासाठी गेले होते. त्यांना वटवाघळांच्या विष्ठा आणि इतर घाण साफ करावी लागली होती. त्यानंतर ते एका विचित्र श्वसनाच्या त्रासामुळे आजारी पडले होते. पुढील १-२ आठवड्यामध्ये या सहा कामगारांपैकी ३ कामगार मृत्युमुखी पडले. या कामगारांना झालेला रोग वटवाघळांमधील विषाणूमुळे झाला असावा, असा निर्वाळा सार्स आणि कोविड मधील आजारावरील मुख्य तज्ज्ञ चीन मधील डॉ. झोन्ग ननशांग यांनी दिला होता.

एका चिनी विद्यार्थिनीने तिच्या चिनी भाषेतील प्रबंधात या खाण कामगारांच्या आजाराचे विश्लेषण केले आहे. त्यातील रोग्यांच्या क्ष किरण आणि C.T. स्कॅनचे साम्य नॉवेल कोरोना विषाणूशी असल्याचा निर्वाळा पुण्यातील क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. आनंद रहाळकर यांनी दिला आहे. या सगळ्या पुराव्यांमुळे नॉवेल कोरोना विषाणूचा उगम या युनानमधील खाणींतून झाला असावा, असा संशय डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर यांनी व्यक्त केला आहे.

'२०१२ मध्येच चीनमधील खाणकामगारांना झाला होता कोविडसदृश आजार'

डॉ. झोन्ग ननशांग यांनी मध्यंतरी कोरोना विषाणूचा उगम हा वुहानमध्ये झाला नाही असा निर्देश केला होता. त्याचा अर्थ 'युनानमध्ये' असाही होऊ शकतो. ही खाण बंद केली आहे, असे सांगण्यात येते. तरीही, वुहान इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि चीनमधील इतर संस्था या खाणीला नियमित भेट देत असल्याचे पुरावे पण मिळाले आहेत. ही खाण युनानमध्ये असून वुहानपासून ११०० किलोमीटर लांब आहे. या भेटींमध्ये तेथील वटवाघळांच्या विष्ठेचे आणि अन्य नमुने वुहान प्रयोगशाळेत आणले जात होते. वुहानची प्रयोगशाळा वेगवेगळ्या विषाणूचे नमुने आणि जिवंत विषाणू साठवून ठेवते. या प्रयोगशाळेत त्याच्या जनुकीय माहितीमध्ये बदल करून त्याचे त्या विषाणूच्या वेगवेगळ्या प्राण्यांना संसर्ग करण्याच्या क्षमतेमध्ये झालेल्या बदलांवर संशोधन करण्यात येते. त्यामुळे नॉवेल कोरोना विषाणू हा त्या प्रयोगशाळेतील एक प्रयोग तर नाही ना, असाही संशय आहे. चीनच्या माहिती दडवून ठेवण्याच्या स्वभावामुळे या विषाणूची अजूनही खरी माहिती प्रसिद्ध झालेली नाही. या संशोधकांना मिळालेली ही माहिती या विषाणूच्या उत्पत्तीमधील एक धागा आहे.

चीनने मात्र कुठल्याही संशोधन पेपरमध्ये आरएटीजी ( RaTG )१३ किंवा अन्य सार्स, कोरोना आणि या खाणकामगारांच्या न्यूमोनियाचा संबंध असल्याची नोंद केली नाहीये. या माहिती लपवण्यामध्ये किंवा अर्धसत्य सांगण्यामागे काय कारण आहे, असा सवाल देखील या शास्त्रज्ञांनी केला आहे.

Last Updated : Aug 21, 2020, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details