पुणे-नैसर्गिक वातावरणात शीतगृहामध्ये साठवलेल्या कांद्याचे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन केंद्राने कांदा साठवणुकीचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या केंद्रामध्ये प्रचलित साठवणुकीच्या पद्धतीपेक्षा 50 टक्के कमी नुकसान होणार आहे.
कांद्यावर संशोधन करणारे राजगुरुनगर येथील कांदा-लसूण केंद्र व चाकण येथील बाला बायोटेक यांच्या समन्वयातून कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याबाबत आज चाकण येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाबाड, कांदा लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, विविध बँकांचे अधिकारी, शेतकरी व बाला बायोटेकचे अधिकारी उपस्थित होते. कांदा साठवणुकीतील तंत्रज्ञानाचा ग्राहक व उत्पादक या दोघांनाही चांगला फायदा होणार असल्याचे कांदा लसूण संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. राजीव काळे यांनी सांगितले.
कमी खर्चातून उभारले कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्याची कांदा लसूण केंद्रावर आहे जबाबदारी
मागील काही वर्षापासून वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, कांदा पिकांवर होणारा रासायनिक खतांचा वापर ,यामुळे पिकवलेला कांदा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यावर केंद्रीय पातळीवर कांद्याचे उत्पादन वाढून कांद्याच्या उत्पादनात स्थिरता आणण्यासाठी राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार दीर्घकाळ कांद्याची साठवणूक करण्यासाठी कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यापुर्वी शेतकरी प्रचलित पद्धतीने कांद्याची साठवणूक करत होते. मात्र, यातून साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र सर्रास दिसून येते. हे नुकसान टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानातून विकसित केलेली पद्धत शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असल्याचे कांदा-लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी सांगितले.
कांद्याच्या साठवणुकीसाठी कमी खर्चात विकसित केलेले हे तंत्रज्ञान सरकारी पातळीवरून अनुदान देऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकरी सहजतेने समस्येवर मात करू शकेल असा विश्वास बाला बायोटेकचे संचालक मनोज फुटाणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे आणि साठवणुकीतील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती प्रति किलो शंभरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.