पुणे-महापालिकेने शहरात विविध 16 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, राज्य शासनाने केवळ 8 ठिकाणी लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. शिवाय महापालिकेने मागणी केलेल्या संख्येपेक्षा अर्ध्याच लसी मिळाल्या असून, उद्या 800 वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसर्या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचार्यांना लस देण्यात येईल. यानंतर पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्याधिकारी व कर्मचार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर 1 लस देणारा, दोन पर्यवेक्षक आणि एका सुरक्षारक्षकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना लसीकरणाचा दिनांक आणि वेळीची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येणार आहे.