पुणे- सध्या सोशल मीडियावर पोलीस चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ट्वीटर, फेसबूक यांसारख्या समाज माध्यमांतून नेटीझन्सला रिप्लाय देताना अनेक भन्नाट गोष्टी पुढे येत असतात. यामध्ये मुंबई पोलीस कायमच अग्रेसर आहेत.
परंतु, आता पुणे पोलिसांनी एका महिलेचा नंबर विचारणाऱ्या रोमियोचा चांगलाच समाचार घेतलाय. ट्वीटरवरील या भन्नाट रिप्लायमुळे पुणे पोलीस नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत.
काय आहे किस्सा ?
पुणे पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवर एका महिलेने धानोरी पोलीस ठाण्याचा क्रमांक विचारला. याला पोलिसांनी तत्काळ प्रत्युत्तर ट्वीट केले. संबंधित महिलेच्या ट्वीटवर एका रोमियोने पुणे पोलिसांना टॅग करून 'मला तुमचा (महिलेचा) नंबर मिळेल का' असे विचारले.
यावर पुणे पोलिसांनी ट्वीट करून 'आता आम्हाला तुमचा नंबर जाणून घेण्यात रस आहे', असे ट्वीट केले. तसेच 'आम्ही प्रायव्हसी जपतो' असे सांगून या रोमियोला पर्सनल मेसेज करायला सांगितले. पुणे पोलिसांच्या या ट्वीटमुळे पोलिसांचे सोशल मीडिया अकाऊंट चांगलेच चर्चेचा विषय ठरला आहे. सर्व स्तरांतून पोलिसांच्या ट्वीट बद्दल भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.