पुणे - लॉकडाऊनच्या काळात अनेकदा विनंती करूनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या लोकांवर पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी २७० वाहने जप्त केली आहे.
शहर पोलीस मागील आठवड्यापासून लोकांना घराबाहेर पडू नका, तसेच गर्दी करू नका, अशी विनंती करत आहे. मात्र, तरीही लोक पोलिसांचे ऐकण्यास तयार नाहीत. यामुळे पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाचा वापर सुरू केलाय. विनाकारण रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 30 मार्चपर्यंत शहरात ६७७ जणांविरुद्ध १८८ कलमाखाली नोटीस बजावण्यात आली होती. आज दिवसभर १३१ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
विनंती करूनही न ऐकणाऱ्यांवर उगारला कायद्याचा बडगा - lockdown in pune
लॉकडाऊनच्या काळात अनेकदा विनंती करूनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे.
वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसात २७० वाहने जप्त केली आहे. या वाहनचालकांना आता त्यांची वाहनं पुढील १४ दिवस मिळू शकणार नाहीत. तसेच संबंधितांना त्यांचे वाहन न्यायालयामार्फत सोडवून घ्यावे लागणार आहे. गेल्या दोन दिवसात शहरातील पोलीस ठाण्यांनी ४१७ जणांवर १८८ खाली कारवाई केली आहे.
या लोकांवर पोलीस आता न्यायालयात खटला दाखल करणार असून त्यांना न्यायालय शिक्षा किंवा दंडात्मक कारवाई करणार आहे. पोलिसांनी आता लाठीचा प्रसाद देण्याऐवजी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.