पुणे -पुण्यातील मुळशी तालुक्यात गांजाची शेती केली जात आल्याची पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी १८ किलो गांजा पकडला आहे. मुळशीतील आंबेटवेट गावातील शेतात गांजाच्या तब्बल अडीचशे झाडांची लागवड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुळशी तालुक्यात गांजाची शेती या प्रकरणी चौघांना अटकपुणे पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. साहेबा हुलगप्पा म्हेत्रे आणि चेतन मारुती मोहोळ यांना पहिल्यांदा सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चौकशीनंतर प्रकाश वाघोजी खेडेकर व इंदुबाई खेडेकर यांची नावे समोर आली. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून दोघांना पकडले अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कोथरूड परिसरात दोन तरूणांकडे गांजा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने याठिकाणी सापळा रचत चेतन मोहोळ व साहेबा म्हेत्रे या दोघांना पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे अर्धा किलो गांजा मिळून आला.
घरातून १८ किलो गांजा जप्त या दोघांनी हा गांजा मुळशी तालुक्यातील आंबेटवेट गावातून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी या गावातून माहिती काढली असता येथील गवळीवाडा येथे खेडेकर कुटुंबाकडे गांजा असल्याचे समजले. पोलीसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना घरातच १८ किलो गांजा मिळाला. त्यांच्याकडून हा गांजा या दोघांना विकण्यात आला होता. पोलीसांनी त्यांच्याकडे या गांजाबाबत चौकशी केली. त्यावेळी पोलीसांनी गांजाची शेतीच दाखविली. शेतीची पाहणी केल्यानंतर पोलीसांना मोठ्या प्रमाणात गांजाच्या झांडाची लागवड केली असल्याचे दिसून आले.