महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी.. 30 जानेवारीला होणार परिषद

एल्गार परिषदेच्या आयोजनाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली असून, येत्या 30 जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होणार आहे. यापूर्वी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी ३१ डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती.

elgar parishad
elgar parishad

By

Published : Jan 23, 2021, 11:30 PM IST

पुणे - 31 डिसेंबरच्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यानंतर आता 30 जानेवारीला एल्गार परिषद घेण्यास अखेर परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषद होणार आहे.

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद घेण्यासाठी आयोजक निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती. स्वारगेट पोलिसांकडे ही परवानगी मागण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. ही परिषद येत्या शनिवारी ( ता.30) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.

२०१७ च्या परिषदेनंतर कोरेगाव-भीमात उसळला होता हिंसाचार -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेला परवानगी देत असताना पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. सरकारच्या नियमानुसार या परिषदेला 200 व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे. 31 डिसेंबर 2017 ला पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या एल्गार परिषदेमध्ये झालेल्या भाषणावरून वाद उभा राहिला होता. त्यानंतर 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला होता. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एल्गार परिषदेमुळे हा हिंसाचार भडकल्याचा ठपका पोलिसांनी ठेवत काही विचारवंतांवर कारवाई देखील केली तसेच पुढे एल्गार परिषद भरवण्याला परवानगी नाकारण्यात आली होती.

दरम्यान सरकार बदलल्यानंतर आता पुन्हा एकदा एल्गार परिषदेसाठी आयोजकांनी परवानगी मागितली होती. 31डिसेंबर 2020 एल्गार परिषद आयोजित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पुन्हा आयोजकांनी पत्रकार परिषद घेत जर 30 जानेवारीला एल्गार परिषद आयोजनाची परवानगी नाकारली तर रस्त्यावर परिषद घेऊ, असा इशारा दिला होता. अखेर आयोजकांना परवानगी मिळाली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details