पुणे - सॅनिटायझर निर्मितीच्या नावाखाली अवैध दारूसाठी स्पिरीट पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात बिनदिक्कतपणे हा गोरखधंदा सुरू होता. या कारवाईत स्पिरीटचे 2 टँकर जप्त करण्यात आले आहेत. तसेच या टॅंकरमध्ये तब्बल साडेचाळीस हजार लीटर स्पिरीट आढळून आले. तर दोन टँकर आणि एका चार चाकी वाहनांसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
पुणे पोलिसांकडून सॅनीटायझर निर्मितीच्या नावाखाली अवैध दारुसाठी स्पिरीट पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. हेही वाचा...अबब... पुरुषांबरोबर आता महिलांच्याही दिल्लीत दारूच्या दुकानांसमोर रांगा
भांगे ऑर्गनिक केमिकल्समध्ये सॅनिटायझर बनवले जाते. मात्र, येथे आलेले सॅनिटायझर दारू निर्मितीसाठी इतरत्र पाठवले जात होते. सॅनिटायझर निर्मितीच्या नावाखाली हा गोरखधंदा सुरू होता. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाट्यावर ही कंपनी आहे. याबाबत माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत उस्मान सय्यद शेख, संजय भांगे, ज्ञानेश्वर मगर, तानाजी दरांडे, श्यामसुंदर लटपटे आणि शिवाजी शिंदे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. उस्मान शेख हा बनावट दारू उद्योगांना स्पिरिट पुरवणारा म्होरक्या आहे.
हे स्पिरिट लातूर जिल्ह्यातील रिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड इथून आले. अहमदपूर तालुक्यातील महेश नगरची ही कंपनी आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू असून एक पथक सिद्धी शुगर कंपनीत गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत अवैध दारू व्यवसाासाठी स्पिरीट पुरवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे आयुक्त प्रसाद सुर्वे, पुणे अधीक्षक संतोष झगडे आणि अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांनी ही कारवाई केली.