पुणे - लॉकडाऊनचा कालावधी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक हाल सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत. रोजच्या कमाईतून कुटुंब चालवणारे अनेक नागरिक सध्या चांगलेच अडचणीत आहेत. अशा नागरिकांच्या मदतीसाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेतला असून त्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा...मुंबईतील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी; ...तर पुण्यातही प्रयोग शक्य
पुण्यातील इंदिरा वसाहत, सकाळ नगर येथील धुणी भांडी करणाऱ्या महिला दीड महिन्यापासून कामावर न गेल्याने त्यांना पगार मिळाला नाही. त्यातील बहुतांश महिला विधवा असल्याने त्यांना उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. त्यांची ही अडचण समजल्याने पोलिसांनी त्यांमा मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांची मदत घेऊन या महिलांना गव्हाचे पीठ, साखर, तांदूळ, तुरडाळ, चहा पावडर, मसाला, हळद, मीठ, तेल असे साहित्य वाटले. तिघांच्या कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतके अन्नधान्य ३९ महिलांना वाटप करण्यात आले.
दुसऱ्या एका घटनेत अडचणीत असलेल्या रिक्षाचालकांना दत्तवाडी पोलिसांनी मदत केली. काही रिक्षाचालक लॉकडाऊनमुळे घरीच बसून आहेत. ते आणि त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. अशी माहिती दत्तवाडी पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी रिक्षाचालकांना बोलावून त्यांना काही दिवस पुरेल इतके अन्नधान्य दिले.