पुणे -गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी संतोष जाधव याला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संतोष जाधव याच्या टोळीतील सदस्यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 13 गावठी पिस्तुल जप्त केले गेले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर, ता.जुन्नर, जि. पुणे येथील पाणी व्यावसायिकाला 5 ते 6 महिन्यापुर्वी संतोष जाधव याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधत 50 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी नाही दिली तर गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, फिर्यादीने भितीने कोठेही तक्रार दिली नव्हती. त्यानंतर संतोष जाधवने पुन्हा एकदा पैशांची मागणी करत टोळीतील एकास पाणी प्लांटवर पाठवले होते. पण, तेव्हा देखील घाबरुन फिर्यादीने तक्रार केली नाही. अखेर संतोषला अटक केल्याची माहिती मिळताच तक्रारदाराने नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलिसांनी संतोष जाधवकडे चौकशी केल्यानंतर त्याने खंडणीसाठी पाठवलेल्यांची नावे सांगितली आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी जिवनसिंग दर्शनसिंग नहार ( वय २३ वर्षे, रा. मंचर ), श्रीराम रमेश थोरात ( वय ३२ वर्ष, रा. मंचर ), जयेश रतीलाल बहिराम ( वय २४ वर्षे, रा घोडेगाव ), वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे ( वय १९ वर्षे, रा. जळकेवाडी, चिखली ) रोहीत विठ्ठल तिटकारे ( वय २५ वर्षे, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे ( वय २२ वर्षे, रा. धावेवाडी, नायफड), जिशान इलाईबक्श मुंढे ( वय २० वर्षे, रा. घोडेगाव ) या सात जणांना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयात हजार केले असताना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.