पुणे - एकीकडे राज्यासह पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसंदिवस वाढ होताना दिसत आहे तर दुसरी कडे पुण्यातील काही हॉटेल्समध्ये सर्रास कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून पार्ट्या केल्या जात आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील चार बड्या हॉटेल्समध्ये अशा सर्रासपणे सुरू असलेल्या पार्टीची चुनक पोलिसांना लागली असतां मुंढवा पोलिसांनी या चार हॉटेल्समध्ये जाऊन स्वतः साउंड सिस्टमबंद करून कारवाई ( Pune Police Action on Hotels ) केली आहे.
पुण्यात सर्रास कोरोना नियमांचे उल्लंघन -
पुणे शहरात एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासनाच्यावतीने वारंवार कोरोनाच्या नियमावलीच पालन करण्यात यावं यासाठी आवाहन केले जाते आहे. असे असले तरी नागरिकांच्यावतीने कोरोना नियमावलीला गांभीर्याने घेतले जात नाही. असे असताना प्रशासनाच्यावतीने आत्ता कडक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. मुंढवा येथील चार मोठ्या हॉटेल्समध्ये सर्रास कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करून पार्टी केली जात होती. त्यावेळेस पुणे पोलिसांनी स्वतः हॉटेल्समध्ये जाऊन साउंट सिस्टम बंद करून कारवाई केली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांचे आवाहन -
शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात 9 दिवसांआधी शहरातील कोरोनाची दैनंदिन संख्या ही शंभरच्यापटीत होती. पण सातत्याने ही रुग्ण संख्या वाढत आहे. आज ही रुग्णसंख्या 1805 झाली आहे. याचा अर्थ असा की तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या लाटेला जर आटकाव घालायचा असेल तर सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्यावतीने मास्क घालणं आणि सोशल डिस्टनसिंगबाबत शिथिलता देण्यात आली होती. पण आता वाढत्या कोरोना रुग्णसंख्या पाहता निर्बंध कडक करण्याची वेळ आली आहे. आता नागरिकांनी शिस्त पाळावी म्हणून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाईची मोहीम पुणे पोलिसांच्यावतीने घेण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत सहकार्य केले असेच सहकार्य आताही करावे आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावावा, असे आवाहन पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.