पुणे - लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक पुणेकरांवर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई केली. वानवडी, स्वारगेट पोलीस स्टेशनसह इतर ठिकाणीही पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये मॉर्निंग वॉकसह परवानगी नसतानाही इतर कामासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांचा समावेश आहे.
संपूर्ण पुण्याला सध्या कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. परंतु असे असतानाही मॉर्निंग वॉकसाठी अनेक पुणेकर घराबाहेर पडत आहेत. हे यांच्यासह इतरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या पुणेकरांना पोलिसांनी आता कारवाईचा बडगा दाखवला आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी मॉर्निग वॉकला निघालेल्या या महाभागांकडून पोलिसांनी भर रस्त्यात व्यायाम करून घेतला.