पुणे - राज्याच्या बहुतेक भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेध शाळेने दिला आहे. सह्याद्री घाट परिसरात वेगाने वारे वाहणार असून येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
'पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाचा इशारा' -
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा भागात काही ठिकाणी मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाची आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे. दरम्यान पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. शहर आणि परिसरात ढगांची गर्दी पहायला मिळाली असून, मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पूर्व मोसमी पावसाने राज्यात ही अनेक भागांना झोडपून काढले आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे तसेच जोरदार पाऊस पाहायला मिळत असून येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
'24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण गोवा तसेच विदर्भात पावसाची शक्यता' -
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण गोवा तसेच विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघ गर्जना विजांच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 जून ते 4 जून या तीन दिवसांच्या काळात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.