पुणे - चाकण औद्योगिक नगरीतील मेदनकरवाडी येथील बालाजीनगर परिसरात मुलींची छेडछाड केल्याच्या संशयावरून सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाला फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या तरुणाचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आकाश बाबुराव शेलार (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
चाकणमध्ये टोळक्याकडून मारहाण झालेल्या 'त्या' तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू - पुणे
मुलींची छेडछाड केल्याच्या संशयावरून चाकणमध्ये एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. या तरुणाचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आकाश हा मुळ लातूर येथील रहिवासी होता. त्याच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूनंतर दिलेल्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. अमित उर्फ आण्णा बजरंग माने, पद्माकर चितलेवाड, संदीप किसन कुसाळकर, गणपत लोहार, आकाश दौंडकर, सागर विटकर, सोन्या तामळगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर मारहाण करुन खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास बालाजीनगर स्टॉप जवळील साई पान शॉपच्या पाठीमागे असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आरोपींनी हातातील फावड्याच्या दांडक्याने आकाशला डोक्यात, हातावर, पायावर व पाठीत जबर मारहाण करून जखमी केले होते. त्यानंतर स्थानिकांनी आकाशला उपचारासाठी प्रथम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला नंतर मॅक्स न्यूरो हॉस्पिटल आणि रुबी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. मात्र आकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.