पुणे -येथील आंबिल ओढा परिसरात असलेली अतिक्रमण हटवण्याचे काम पुणे महापालिका प्रशासनाने आज सकाळपासून सुरू केले होते. स्थानिक नागरिकांचा विरोध झुगारून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान, या कारवाईला आता प्रथमसत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक नागरिक असलेल्या हनुमंत फडके यांनी या संदर्भात प्रथमसत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिच्यावर आज दुपारी तातडीने सुनावणी झाली. त्यानंतर आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
'पुनर्वसन कशाप्रकारे करणार?'
न्यायालयाने दिलेल्या आदेशात येथील नागरिकांचे पुनर्वसन कशाप्रकारे करणार याची माहिती न्यायालयासमोर नाही. अशावेळी या नागरिकांना उद्ध्वस्त करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगत महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती देत असल्याचे नमूद केले आहे. जोपर्यंत येथील नागरिकांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला स्थगिती देत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
नागरिकांचा विरोध
आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज (गुरूवार, २४ जून) सकाळी पोलीस बंदोबस्तात महापालिकेचे कर्मचारी हजर झाले. परंतु स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. काही नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचाही प्रयत्न केला.