पुणे - शहरातील रस्त्याची चाळण होण्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना आता त्याची किंमत मोजावी लागणार आहे. दोष दायित्व कालावधीतील ( डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी ) ज्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, त्यासाठी ठेकेदारांकडून प्रतिखड्डा ५ हजार रुपये इतका दंड वसूल केला जाणार आहे.
शहराच्या सर्वच भागात रस्ते खोदण्यात आले - हा निर्णय मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयस्तरावर काम केलेल्या प्रत्येक ठेकेदाराला लागू असणार आहे. दरम्यान, शहरातील पाच हजार खड्डे बुजवण्यावर महापालिकेचा आत्तापर्यंत सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. गेले वर्षभर विविध कारणांसाठी शहराच्या सर्वच भागात रस्ते खोदण्यात आले होते. ( Pune Municipal Corporation Vs contractors ) पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून तेथे सिमेंट काँक्रिट तसेच डांबर टाकून रस्ते दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळ्यात पुणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही, असा दावा महापालिकेने केला होता. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली. यावर टीकेची झोड उठल्याने महापालिकेने कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.