पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. आवश्यक कामांसाठी निविदाही काढल्या. पण, आता तीन सदस्यांची प्रभाग पद्धतीच रद्द झाल्याने आतापर्यंत मतदारयादीवर झालेला खर्च वाया जाणार आहे. मतदारयाद्यांच्या छपाईसाठी २५ लाख रुपयांचा खर्च झाला ( Pune Corporation Election ) आहे. तर या याद्यांच्या विक्रीतून ५ लाख ७५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तरीदेखील २० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
पुणे महापालिकेने तीन सदस्यीय प्रभागानुसार केली तयारी : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीनच्या प्रभागानुसार तयारी सुरू करण्यात आली. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर महापालिकेने मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले होते. ३१ मे २०२२ पर्यंत शहरात ३४ लाख ५४ हजार इतकी मतदारसंख्या निश्चित करण्यात आली. या मतदारांची प्रभागनिहाय फोड करून प्रारूप मतदारयादी जाहीर केली.
काही उमेदवारांनी पेनड्राईव्हमध्ये मतदारयाद्या घेतल्या : प्रभागरचना अंतिम झाली, तरी आपल्या हक्काचे मतदार आपल्या प्रभागात आहेत. दुसऱ्या प्रभागात गेले याची चिंता इच्छुक उमेदवारांना असते. तीनचा प्रभाग करताना सरासरी एका प्रभागाचे मतदार ५५ हजार इतके होते. प्रारूप मतदारयादीचा अभ्यास करण्यासाठी निवडणूक शाखेच्या कार्यालयातून मतदारयाद्या विकत घेण्यात आल्या. त्यासाठी प्रति पान दोन रुपये इतके शुल्क घेण्यात आले. काही जणांनी थेट पेनड्राइव्हद्वारे मतदारयाद्या घेऊन त्यांचा अभ्यास सुरू केला. यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांचा समावेश होता.