पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुण्यात शास्त्री मार्ग येथे मोठ्या संख्येने एमपीएससी विद्यार्थी वस्तीगृहात, अथवा भाड्याने खोली करून राहतात. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम बदलाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी त्यांना रोखले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलिसांना हाताशी धरुन गळचेपी करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला ( mpsc students agitation against new syllabus in pune ) आहे.
...म्हणून विद्यार्थ्यांनी घेतला आंदोलनचा पवित्रा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात आता ऐवजी 2025 लागू करावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली होती. त्याबाबतचे पत्र तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत अवगत केले होते. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, जमण्याचे ठिकाण येथे कडक पहारा ठेवल्याने मनात दहशत निर्माण केली. परिणामी आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
याबाबत नितीन देशमुख ( विद्यार्थ्याचे नाव बदलले आहे ) याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, 'एमपीएससीने 2012 पासून एम.सी.क्यू मल्टिपल चॉइस क्वेश्चन या पद्धतीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा सुरू केली. त्यापूर्वी सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती विस्तारित उत्तरे लिहा या स्वरूपाची होती. मात्र, आता मल्टिपल चॉइस क्वेश्चन ही पद्धत रद्द करून पुन्हा वर्णनात्मक रितीने उत्तरे लिहावी ही पद्धत आणलेली आहे. या नवीन पद्धतीमुळे गेल्या दहा वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी आधीच्या म्हणजे मल्टिपल चॉइस क्वेश्चन या पद्धतीचा सराव केला असल्याने नवीन पद्धतीने प्रश्नांची उत्तरे सोडवणे हे जिकरीचे जाणार असल्याचं म्हटलं आहे.'