पुणे : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असूनही, रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही. गुरुवारी पुणे जिल्ह्यात तब्बल 4 हजार 571 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर तब्बल 85 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
गुरुवारी नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1,964, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 1,113 आणि पुणे ग्रामीण भागात 1,124 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा वाढता संसर्ग पाहता आता मुंबईप्रमाणे पुण्यातील नागरिकांसाठीही संचारबंदी लागू करण्याचे संकेत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत.