पुणे -मोकळे आकाश असताना अनेक धावण्याच्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील परंतु, लोणावळा सारख्या पर्यटनस्थळी चक्क पावसाळ्यात 'लोणावळा राजमाची ट्रेल रण' ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत शंभरपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता.
लोणावळा राजमाची ट्रेल रण स्पर्धा शिवदुर्ग मित्र मंडळ आणि रणबर्न मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत डोंगर, नागमोडी वळणं त्याच बरोबर खाच खळगे यातून वाट काढत धावायचे होते. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत बहुतांश तरुणी आणि महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा ५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर अशा तीन टप्प्यात पार पडली.
चक्क पाऊसाशीच शर्यत लावल्यासारखाच अनुभव होता असे स्पर्धकांचे म्हणणे होते. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात १२ इंच पर्यंत पाऊस झाला आहे. अशा मुसळधार पावसात राजमाची ट्रेल रण ही धावण्याची स्पर्धा घेतली गेली. पर्यटकांकडूनही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, या स्पर्धेत अनेक अडचणी होत्या. त्या पार करत धावणे तेवढेच कठीण होते. डोंगर, निसर्गरम्य वातावरण, डोक्यावर कोसळणारा पाऊस, रस्त्यावरील खड्डे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नागमोडी वळणे या सर्व अडचणी पार करत विजयी लक्ष्य अनेकांनी ठेवले होते.
हिवाळा ऋतूमध्ये अशा धावण्याच्या स्पर्धा (मॅरेथॉन) घेतल्या जातात. परंतु, पावसाळ्यात होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेमुळे अनेकांची ट्रेकिंगची हौसही पूर्ण झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटरमध्ये गौरव शिरवाळकर आणि हेतल ठक्कर तर १० किलोमीटरमध्ये स्वप्नील मुन आणि स्त्रियांमध्ये अनुष्का पाटील, ५ किलोमीटमध्ये भिमांशू हे स्पर्धक अनुक्रमे पहिले आले आहेत.