पुणे -राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माघारीनंतर प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस अशा सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात शिवसेसेनेकडून तीन जणांनी बंड केले आहे. कसबा मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली असून कमल व्यवहारे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळक तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा... 'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
वडगावशेरी मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी भाजपकडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे निवडणूक लढवत आहेत. खडकवासला मतदारसंघातून शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पर्वती मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होता, यामुळे काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोध बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.