पुणे -ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांची निवड झाल्याने पुणेकरांसह महाराष्ट्राचीही मान उंचावली आहे. ते ग्रँडमास्टर किताब मिळविणारे पहिले पुणेकर आणि दुसरे महाराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेत.
हेही वाचा -वाडेश्वर कट्ट्यावर तोंड गोड करत राजकीय विरोधकांचे दिवाळी सेलिब्रेशन
पुण्यात कुंटे यांनी बुद्धिबळ संस्कृती निर्माण केली
पुण्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षांत बुद्धिबळ संस्कृती निर्माण करण्यात कुंटे यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्या यशातून अनेक युवा बुद्धिबळपटूंनी प्रेरणा घेतली आहे. सध्या ते भारतीय बुद्धिबळ संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत.
बहिणीमुळे बुद्धिबळाची गोडी
अभिजित कुंटे यांना त्यांची बहीण बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे यांच्या मुळे बुद्धिबळाची गोडी लागली. त्यानंतर त्यांनी मोहन फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवून अवघ्या अकराव्या वर्षी बारा वर्षांखालील मुलांच्या गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. त्यानंतर विविध वयोगटातील सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद, आशियाई, कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पदके त्यांनी मिळविली आहेत. मानाच्या शिवछत्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत त्यांनी तीन वेळा सहभाग घेतला आहे.
खेळाचा प्रसार करण्यात कुंटे यांचे मोलाचे योगदान
विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे, कोनेरू हम्पी अशा काही खेळाडूंनी बुद्धिबळाला लोकप्रियता मिळवून दिली. याच देदीप्यमान परंपरेत फक्त खेळाडू म्हणून न चमकता, या खेळाचा प्रसार करण्यात कुंटे यांचे मोलाचे योगदान आहे. प्रशिक्षक म्हणून अनेक खेळाडू घडवितानाच बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन - संघटन, अनेक खेळाडूंशी एकाच वेळी बुद्धिबळ खेळण्याचे उपक्रम, अशा मार्गांनी अनेक विद्यार्थ्यांना या खेळाची गोडी लावण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत.
हेही वाचा -रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना दिवाळीनिमित्ताने 'अभ्यंगस्नान'; आबा बागुल मित्र मंडळातर्फे आयोजन