पुणे/मंचर -सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखिले याची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यात ही तिसरी हत्या झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सचिन जाधव याचा रात्री आठच्या सुमारास पैशाच्या देवाणघेवाण वरून निर्घृण खून करण्यात आला होता. तर दुसऱ्याच दिवशी द्रोपदाबाई गिरे या महिलेचा खून झाल्याचे आढळून आले होते.
आंबेगावात भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून गुन्हेगाराची हत्या, 2 महिन्यातील तिसरी घटना पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज
अशाच प्रकारे आज रविवार (दि. १) रोजी सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखिले याची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटना घडल्यानंतर मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यापूर्वी केवळ एमआयडीसी परिसरात किंवा पुणे शहर आणि आजूबाजूला अशा प्रकारचे गुन्हे घडत होते. मात्र आता ग्रामीण भागात देखील गुन्ह्यांचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहे.
हेही वाचा -Tokyo Olympics : जय हो! भारताला आणखी एक पदक; पी. व्ही. सिंधू कांस्य पदकाची मानकरी