पुणे -शहरातील अनेक रस्त्यांवर नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. खोदकामानंतर तात्पुरती मलमपट्टी करून त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना खड्डे पडले असून त्यांची चाळण झाली आहे. या खड्ड्यांविरोधात पुणे शहर काँग्रेसच्यावतीने आज विटू दांडूचा खेळ खेळून आंदोलन करण्यात आले. तर, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपकडून येत्या 15 दिवसांत खड्डे बुजवले जातील असे सांगण्यात आले.
हेही वाचा -राज्यात 'या' ठिकाणी विक्रमी पाऊस; नऊ दिवसात 2 हजार 829 मिमी पावसाची नोंद
विशेष म्हणजे, शहर काँग्रेसतर्फे आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर ज्या ठिकाणी आंदोलन होणार होते, त्या ठिकाणचे खड्डे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी रातोरात बुजवल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी आंदोलनादरम्यान सांगितले.
तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली होती मलमपट्टी
एप्रिल-मे महिन्यात शहरातील जुन्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शहरातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, तसेच सिंहगड रस्ता, सहकारनगरसह वेगवेगळ्या भागात खोदकाम करून नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या. काही ठिकाणी नव्याने जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. हे काम ज्या वेळी सुरू होते त्या वेळी शहर, उपनगरातील व्यापारी दुकाने निर्बंधांमुळे बंद करण्यात आली होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्या वेळी भर पावसात ठेकेदारांनी रस्ते दुरुस्ती केली. खोदकामामुळे पडलेले खड्डे बुजवले. रस्त्यांवर सिमेंटचा थर टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र, शहरात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठेकेदारांनी केलेल्या रस्ते दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. शहर, तसेच उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर तात्पुरत्या कामाने बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांमधील खडी बाहेर आली आहे.