पुणे - ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाचे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव होत आहे. कलाकारांना पिढ्यान् पिढया सन्मान मिळावा, कला वृद्धिंगत होत राहावी आणि त्यांची मेहनत सुफळ संपन्न व्हावी, अशी सदिच्छा पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी यावेळी व्यक्त केली.
१२ ते १४ फेब्रुवारीला आयोजन
पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे १२ ते १४ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत अखंडपणे होत असलेल्या ‘ख्याल यज्ञ’ संगीत महोत्सवात देशातील दिग्गज तसेच नवोदित मिळून ३९ कलाकारांचे सादरीकरण होत आहे. ३९ गायक,१४ तबला वादक,१० पेटीवादक, १ सारंगी वादक, ४ निवेदक यांचा सहभाग हे या संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाने या "खयाल यज्ञाची" सुरुवात झाली. राग तोडी, अहिर भैरव मधील बंदिश भुवनेश कोमकली यांनी सादर करून, तर पं. अजय पोहनकर यांनी राग बसंत बुखारी सादर करून रसिकांची मने जिंकली.
शरद पवार देणार भेट
शुक्रवारी पहिल्या दिवशी पं. उदय भवाळकर, पं. भुवनेश कोमकली, विजय कोपरकर, पं. व्यंकटेश कुमार, आरती ठाकूर -कुंडलकर, पं. कैवल्यकुमार गुरव, सायली तळवलकर, धनंजय हेगडे, सौरभ काडगावकर, अलका देव-मारूलकर, पं. शौनक अभिषेकी, श्रुती सडोलीकर-काटकर, पं. अजय पोहनकर, उस्ताद राशिद खान यांचे बहारदार गायन आयोजित करण्यात आले होते.१३ फेब्रुवारी रोजी अश्विनी भिडे -देशपांडे, पंडित डॉ. राम देशपांडे, पं. जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे-साठे, संदीप रानडे, सौरभ नाईक, ओंकार दादरकर, पंडित रितेश आणि पंडित रजनीश मिश्रा, पद्मा तळवलकर हे मान्यवर गायक सादरीकरण करणार आहेत. तर१४ फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर-टिकेकर, कलापिनी कोमकली, राहुल देशपांडे, निषाद बाक्रे, देवकी पंडित, विनय रामदासन, गौतम काळे, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, पंडित राजन मिश्रा, पंडित साजन मिश्र इत्यादी मान्यवर गायनसेवा रुजू करणार आहेत. रविवारी १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार महोत्सवाला भेट देणार आहेत. पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये "खयाल यज्ञाचा" समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती 'संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान'च्या वतीने देण्यात आली.