पुणे:लोहगाव विमानतळावरून (Pune Airlines) परदेशातील अबुधाबी, बँकॉक, मलेशिया आणि सिंगापूर या चार शहरांसाठी विमानसेवा सुरू (launch airlines for four new cities) करण्याचा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाने विमान कंपन्यापुढे ठेवला आहे. पुण्यातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे विमानतळ प्रशासनाने विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन, त्यांच्याकडे या शहरांत विमान सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विमान कंपन्यांनी प्रशासनाला दिली आहे.
पुणे विमानतळावरून सध्या परदेशात फक्त दुबईसाठी रात्री विमानसेवा सुरू आहे. या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून इतर देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने नुकतीच लोहगाव विमानतळ येथे सेवा देणाऱ्या सहा विमान कंपन्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला खासदार गिरीश बापट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष डोके, एअर लाइन्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत स्वतः खासदार बापट यांनी एअर लाइन्स कंपन्यांना पुण्यातून अबुधाबी, बँकॉक, मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी सेवा सुरू करण्यास विनंती केली.