पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे ( National Highways Authority of India ) नियोजन करण्यात येत असून त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेपासून २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद करुन २ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजता ब्लास्ट करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम सुरू आहे. श्रृंगेरी मठाच्या समोरील सेवा रस्त्याचे कामदेखील करण्यात येत आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ च्या खडकामध्ये ब्लास्टींगद्वारे खोदकामही सुरू आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरुन वाहतूक वळवावी लागणार : एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडसाठी रॉक ब्लास्टींगचे काम करण्यात येत आहे. अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस ( मुंबई बाजू व सातारा बाजू ) थांबवावी लागणार आहेत. त्यासाठी टोल नाक्यावर व इतर ठिकाणी सूचना फलक लावण्याचे काम सुरू आहे. इतर वाहनांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरुन वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी दिशा दर्शक फलक बसविण्याचे कार्यवाहीदेखील सुरू आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना नियोजित पुल पाडण्याच्या वेळेत वाहतूक नियोजनाबाबत अवगत करण्यात आले आहे.