पुणे - पुणे शहरात ठिकठिकाणी पावसाळीपूर्व कामे सुरू आहेत. शहरातील पेठांमध्ये तर मोठ मोठे रस्ते खणून काम केले जात आहे. पावसाळीपूर्व कामे हे 31 मे पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते, पण मागील एक वर्षापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे ही कामे पूर्ण करायला उशीर झाला, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण
लॉकडाऊनमुळे उशीर
दरवर्षी शहरात विविध ठिकाणी पावसाळीपूर्व कामे केली जातात. या वर्षी शहरात 24 तास पाणी पुरवठ्याचेही काम सुरू असल्याने मोठ्या संखने काही भागांत कामे सुरू केली गेली. दरवर्षी ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण केली जातात, पण यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उशीर झाला आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करणे खूप गरजेचे आहे, म्हणून लॉकडाऊनच्या काळात या कामांना सुरवात करण्यात आली. पण, या कामात संबंधित एजन्सीला उपकरणे मिळणे, कामावर कर्मचारी मिळणे हे लवकर उपलब्ध न झाल्याने या कामाला उशीर झाला. नागरिकांची गैरसोय होत आहे, हेही खरे आहे, पण लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील, असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात, तसेच पेठांमधील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज, गटार, तसेच रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. दुसऱ्या लाटेत तब्बल 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ शहरात निर्बंध लावण्यात आल्याने रस्त्यावर नागरिकच येत नसल्याने काहीही वाटत नव्हते, पण पुण्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने आजपासून निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आणि सर्व दुकाने सुरू करण्याच निर्णय घेण्यात आला. पण, शहरात सुरू असलेल्या पावसाळीपूर्व कामांमुळे पुणेकरांना ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
सलून आणि ब्युटीपार्लर सुरू
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने पुण्यात दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. याबाबत सलून व्यावसायिकांमध्ये दुकाने सुरू करायची की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कालच्या आदेशात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, सलून आणि ब्युटीपार्लर सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहे. सलून व्यावसायिकांनी गौरसमज करू नये. जिम, स्पा, हे मात्र बंदच असणार आहे, असे महापौर यांनी सांगितले.
हेही वाचा -अर्थव्यवस्थेच्या रोलर कोस्टर राईडमधून अम्युझमेंट पार्क इंडस्ट्रीला वाचवा; संघटनेची मागणी