पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. मात्र राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुण्यासह राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांनी रस्त्यावर उतरत ही परीक्षा वेळेत घेण्यासाठी आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने ही परीक्षा 21 मार्च म्हणजेच आज घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले.
पुण्यात 77 परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा
कोरोनाच्या प्रादुर्भाव अद्यापही कायम असूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा आज होत असून राज्यात 1800 तर पुण्यात एकूण 77 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत असून एकूण 2 लाख 62 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयोगाने जाहीर केलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. परीक्षेच्या आधी केंद्र सॅनिटायझर करून घेतले राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या आधी ज्या ज्या केंद्रावर परीक्षा होणार आहे त्या-त्या केंद्रावर सॅनिटायझर करून घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनाही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून परीक्षा देता येणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापड्याचा (मास्क) परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक कीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर करणे उमेदवारांना अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आंनद
गेल्या दीड वर्षांनंतर होत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण याआधी विविध कारणाने परीक्षा पुढे ढकलत होती. आयोगाने जाहीर केलेल्या नियमानुसारच आम्ही परीक्षा देणार आहोत. आज परीक्षा होत असल्याने आनंद होत आहे, अशी भावनाही यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.