पुणे :दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, तो पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाराने ट्विट करत म्हटले होते. त्यावर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी संताप व्यक्त करत, अशा अफवा पत्रकारांनी पसरवू नयेत आणि आपली जबाबदारी ओळखून सत्यता पडताळून मग बातम्या द्याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या विरोधात टीका टिप्पणी करा. सरकारचा विरोध करतो म्हणून आम्ही विरोध करणार नाही, उलट त्याचं स्वागत आहे. असेदेखील ते यावेळी म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 55व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.
ही पत्रकारिता आहे का? जावडेकरांनी उपस्थित केला प्रश्न..
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावरून प्रसिद्ध पत्रकाराने ट्विट करत पोलिसाने शेतकऱ्याला गोळी मारल्याची स्वतःची भूमिका मांडली होती. त्यावर आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही लढाई लढली अभिव्यक्ती स्वातंत्र्यसाठी. मात्र, आता पहात आहोत की मीडिया स्वतंत्र आहे, मी त्याचा मंत्री आहे. मीडियाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे पण ती जबाबदार हवी.
जो शेतकरी अपघातात मरण पावला, त्याचा व्हिडिओ समोर आला त्यात पाहिलं की ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येते. त्यावर प्रसिद्ध पत्रकार ट्विट करतात की पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. ही स्वतंत्रता आहे? असा प्रश्न उपस्थित करत ही गैरजबाबदार पत्रकारिता असल्याचे जावडेकर म्हणाले. यामुळे देशात अशांती पसरू शकते.