पुणे-संपूर्ण मे महिना लॉकडाऊनमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हातात पैसा नसल्याने शेतीची कामे करता येणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून मे महिन्यात शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासनाने आदेश जारी करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मे महिन्यात शेतीची कामे उरकली नाहीतर जून मध्ये पेरणी करायला उशीर होतो. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सावकार कर्ज द्यायला तयार नाही आणि कोणी सोने गहाण ठेवायला तयार नाही अशा परिस्थितीत बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकांकडे धाव घेईल. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याचे नियम पायदळी तुडवले जातील. त्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी काही सूचना केल्या आहेत.