पुणे -तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असला पाहिजे, असे मत तरुण आमदारांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी'तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये 'राजकारणातला सोशल मीडिया' या विषयावर तरुण आमदार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री अदिती तटकरे, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, विदर्भातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, शिवाजीनगरचे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.
तारतम्य बाळगत सोशल मीडियाचा वापर करते - "मी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही, अशा पोस्ट आणि थोड्या वैयक्तिक, असे तारतम्य बाळगत सोशल मीडियाचा वापर करते. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. पण आता आम्ही सर्व गोष्टींसाठी तयार झालो आहोत. गोष्टी फेक वाटू नये, अशा तुमच्या पोस्ट असल्या पाहिजेत. मात्र तुमचा सोशल मीडिया हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असला पाहिजे. मात्र २० टक्के महिलाच सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष आणि थेट संवादाला पर्याय नाही. असे यावेळी मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
राजकीय अपरिहार्यता म्हणून सोशल मीडियाचा उपयोग होतो - राजकीय अपरिहार्यता म्हणून सोशल मीडियाचा उपयोग होतो. यामध्ये फायदा होतो तसा खूप तोटाही होतो. लोक पहात असतात की तुम्ही नेमके काय काम करत आहात. सोशल मीडियावर काम दिसले नाहीत, तर लोक विचारतात की तुम्ही नेमके काय करता." भुयार म्हणाले की व्हाट्सअॅप वर महिला जास्त आहेत, त्यामुळे खूप वेळा थेट आणि प्रत्यक्ष संवाद हवाच.असे यावेळी देवेंद्र भुयार म्हणाले.