पुणे : 5 सप्टेंबरला हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केलं आहे.
आठ आरोपींना केली अटक: तुषार हंबीर हल्ला प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी केली आहे.
असा झाला हल्ला : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र सेनेचे संबंधित तुषार हंबीर याच्यावर 5 सप्टेंबर ला पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात चौघांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवित हल्ला परतविला, या घटनेत पोलिस कर्मचारी जखमी झाला होता.
तुषार हंबीर सराईत गुन्हेगार : तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 'मोक्का' नुसार गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे त्याच्यावर 25 ऑगस्ट पासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. 5 सप्टेंबरला त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस पोलीस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केलं आहे.