पुणे -शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस आता शहरातील गल्लीबोळात सायकलवरून गस्त घालणार आहेत. शहरातील वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यांवर गस्त घालता यावी यासाठी पुणे पोलिसांना महानगरपालिकेकडून दहा अद्यावत सायकली देण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत या प्रयोगाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे शहराचे सह पोलिसायुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
पोलीस कर्मचारी गस्त घालताना या सायकलचा वापर करणार आहे. अद्ययावत असलेल्या या सायकलींना सात गिअर आहेत. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आजपासून सायकलवरून पोलीस शिपायांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस शहरात या सायकल वरून गस्त घालणार आहेत. गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांना दररोज काही अंतर सायकल चालवावी लागणार आहे. यामुळे पोलिसांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे.