पुणे- दारू आणि सिगारेटची मागणी करत पोलिसांच्या अंगावर थुंकणाऱ्याला पकडून पोलिसांनी त्याला चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला. पुण्यातील कोथरुड परिसरात ही घटना घडली. अमित कुमार (रा. बिहार) असे या तरुणाचे नाव आहे.
कोरोनाचा धसका: पुण्यात अंगावर थुंकणाऱ्याला पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी चोपले चार-पाच पोलीस एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासंबंधीची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता, हा व्हिडिओ कोथरुड येथील असल्याचे निष्पन्न झाले. कोथरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा बेघर असून तो महापालिकेच्या शेल्टर होममध्ये राहतो. मागील दोन दिवसांपासून तो शेल्टर होममधील इतरांना त्रास देणे, घाण करणे, घराच्या काचा फोडणे असे कृत्य करत होता. आज सकाळी शेल्टरहोममधून तो पळून गेल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून परत आत जाण्यास सांगत होते. परंतु आत न जाता तो पोलिसांनाच शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर थुंकला. त्यानंतर संतापलेल्या पोलिसांनी त्याला बाहेर काढून काठ्यांचा प्रसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोर्ट आणि पोलिसांसमोरील इतर कामे पाहता त्याच्यावर अद्यापतरी गुन्हा दाखल केला नाही. सध्या त्याला शेल्टर होममध्येच ठेवण्यात आले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.