पुणे- नागरिकांचे लक्ष विचलित करून मोबाईल पळवणाऱ्या दोन चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एका दुचाकीसह वेगवेगळ्या कंपन्यांचे 21 मोबाईल असा एक लाख 85 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. मनोज यल्लप्पा मुदगल (वय 39) धर्मा तीम्मा भद्रावती (वय 26) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सराईत मोबाईल चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दुचाकीसह 21 मोबाईल जप्त
सुखसागर परिसरातील शिवाजी गायकवाड हे सामान खरेदी करण्यासाठी रस्त्याने पायी निघाले होते. यावेळी दोन आरोपींनी त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांचा मोबाईल पळवला. हे लक्षात येताच शिवाजी गायकवाड यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून गस्तीवर असलेल्या बिबवेवाडी पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुखसागर परिसरातील शिवाजी गायकवाड हे सामान खरेदी करण्यासाठी रस्त्याने पायी निघाले होते. यावेळी दोन आरोपींनी त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांचा मोबाईल पळवला. त्यामुळे शिवाजी गायकवाड यांनी आरडाओरडा केला. यावेळी त्याच परिसरात बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली.
पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा मोबाईल चोरल्याचे उघड झाले. त्यांच्या ताब्यातून 21 मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एक लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी अजूनही काही चोऱ्या केल्या आहेत, का याचा तपास सुरू असल्याची माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली.