पींपरी-चिंचवड (पुणे ) -मौज मजा आणि दुचाकी वरून फिरण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 40 हजारांच्या 5 दुचाकी आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी केली असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी वीरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय- 22) आणि आशिष ओमप्रकाश परदेशी (वय- 20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघे सराईत गुन्हेगार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सापळा रचून आरोपींना घेतलं ताब्यात -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा, चिंचवडच्या चिंतामणी चौक येथे दोन व्यक्ती संशयितरित्या फिरत असून त्यांच्याकडे एक मोपेड दुचाकी आहे, अशी माहिती मीळाली. त्यानुसार दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
आरोपिकडून 5 दुचाकी आणि 6 मोबाईल जप्त -
त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र ,त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. तिथे अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपिकडून 5 दुचाकी आणि दरवाजा उघडा असलेल्या घरातून चोरलेले 6 मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत.
या पोलीस पथकाने केली कारवाई -
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, मारूती कडु, स्वप्निल शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, पंकज भदाणे, सदानंद रूद्राक्षे यांनी केली आहे.